आम्ही कोण?
ले 

सुदान: आणखी किती चिरफाळ्या उडणार?

  • निळू दामले
  • 31.10.25
  • वाचनवेळ 4 मि.
sudan war

सुदान हा देश आपल्या निकट परिचयाचा नाही. साधारणपणे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश एकत्र केल्यानंतर होईल तेवढाच हा देश आहे. ईशान्य आफ्रिकेतल्या या देशात सध्या धुमश्चक्री चाललीय आणि जगातले बरेच देश त्या धुमश्चक्रीत सामील आहेत. जग किती एकमेकात गुंतलंय ते त्यातून लक्षात येतं. सुदानमधे सध्या देशाचं अधिकृत सैन्य (सुदानीज आर्म्ड फोर्सेस) आणि एकेकाळी या सैन्याचा भाग असलेलं पण आता स्वतंत्र झालेलं फुटीर सैन्य (रॅपिड सपोर्ट फोर्सेस) यांच्यात मारामारी चाललीय. दोन्ही सैन्यांनी २०२३ सालापासून मारामारी करून सुदानची वाटणी करून टाकलीय.

पूर्व सुदानमधल्या एल बशर या शहरातील अधिकृत सुदानच्या सैन्याला फुटीर सैन्याने पळवून लावल्यामुळे तिथल्या संघर्षाला एक नवं वळण मिळालंय. या संघर्षात तिथली हजारो माणसं मारली गेली आहेत आणि लाखो माणसं बेघर झालीयत. उपासमारी आणि रोगराईची समस्या तिथं निर्माण झालीय. फुटीर सैन्य खार्टुमवर चाल करून राजधानीचं हे शहर जिंकण्याची तयारी करतंय.

सुदानला फुटीरतेचा शाप आहे. १९५६ साली सुदान स्वतंत्र झाला. आजवर सुदानमध्ये वीसपेक्षा जास्त बंडं झाली आहेत. कुठलंही सरकार स्थापन झालं रे झालं की सरकार मान्य नसणारे गट उफाळून येतात,बंड करतात. बंडं अर्थातच लष्करी असतात. २०११ साली सुदानची सुदान(उत्तर) आणि दक्षिण सुदान अशी फाळणी झाली. सुदानमधे दोन सैन्यांमधील लढाई निर्णायक झाली नाही तर (उत्तर) सुदान पुन्हा पूर्व सुदान आणि पश्चिम सुदान असं विभागेल. सुदानमधे अनेक तटगट आहेत. अरब, काळे. मुस्लिम, ख्रिस्ती. लोकशाहीवादी, लष्करवादी. लष्करातल्या सेनापतीची सत्तेची हाव हा सुदानमधल्या सर्व भानगडींचा मुख्य प्रभावी घटक असतो.

सध्याच्या लढाईचा ताजा इतिहास हा असा आहे.

सुदानमधे अल बशीर यांची लोकशाही राजवट चालली होती. अल बशीर यांनी पश्चिम सुदानमधल्या अरब जमातीतल्या लोकांना जवळ केलं. त्यांना शस्त्र देऊन त्यांची एक अनधिकृत सेना तयार केली जी नंतर फुटीर सेना झाली. त्यांना येमेनमध्ये यादवी युद्धात लढायला पाठवलं. येमेनमध्ये हुती जमातीच्या लोकांना हाताशी धरून इराणने येमेन काबीज करण्याचा प्रयत्न चालवला होता. इराण या शिया देशाशी अरब सुन्नींचं वैर होतं. अमिरात या अरब देशाने सुदानी अरबांना गोळा करून, शस्त्र देऊन येमेनमध्ये धाडलं. शस्त्रं अमिरातीने दिली. बरेच कंत्राटी सैनिक आणि प्रशिक्षण पुतीन यांनी उभ्या केलेल्या वॅग्नर सेनेने दिलं. या अनधिकृत सैन्याला अल बशीर यांनी अधिकृत सैन्याच्या बरोबरीचं स्थान दिलं. थोड्याच काळात या सैन्याचा प्रमुख हेमेटी प्रबळ झाला आणि अधिकृत सैन्याशी बरोबरी करू लागला, अधिकृत सैन्यात आपल्याला सामील करून घ्या, असं म्हणू लागला.

२०१९ साली अल बशीर यांच्या भ्रष्ट राजवटीविरोधात सुदानमधे आंदोलन झालं. अल बशीर यांनी ते आंदोलन चिरडलं. लोकांच्यातल्या या असंतोषाचा फायदा घेऊन अधिकृत सैन्याचे जनरल अल बुरहानी यांनी बशीर यांचं सरकार बरखास्त केलं आणि सुदानमधे लष्करी राजवट सुरू केली. भ्रष्टाचार पूर्णपणे लष्कराच्या ताब्यात आला. फुटीर सेनेचे हेमेटी आता अधिकृत सैन्याच्या प्रमुखपदाची स्वप्नं पाहू लागले. २०२३ पासून हेमेटी आणि जनरल अल बुरहानी यांच्यात सैन्याच्या नेतृत्वाची मारामारी सुरू झाली.

हेमेटी यांचं फुटीर सैन्य पश्चिम सुदानमध्ये होतं. या सैन्याने पश्चिम सुदानमधली अधिकृत सेनेची ठाणी एका मागामोग एक काबीज करायला सुरुवात केली. हेमेटीच्या सेनेने राजधानी खार्टुमवर हल्ला केला. अधिकृत सेनेने खार्टूममधलं मुख्यालय आवरलं आणि पोर्ट सुदान या शहरात नेलं.

अधिकृत सैन्याला इजिप्त, इथियोपिया, एरिट्रिया, चीन, सौदी अरेबियाचा पाठिंबा आहे. उघड आणि लपून छपून अशा दोन्ही रूपात ते अधिकृत सैन्याला मदत करत असतात. फुटीर सैन्याला प्रामुख्याने संयुक्त अरब अमिरातीचं पाठबळ आहे. शक्यता अशी आहे की अमिरातीने केलेली मदत अधिकृत सैन्याला मिळणाऱ्या मदतीपेक्षा जास्त आहे. अमिरातीतून सुदानच्या पश्चिमेला असलेल्या चॅड या देशातल्या विमानतळावर दररोज विमानंच्या विमानं भरून मदत येत असते. अमिरात म्हणतंय की, ही मदत औषधं, अन्न इत्यादींच्या रूपातली आहे. पण विमानातून येणाऱ्या खोक्यातून दारूगोळा येतो हे एक उघड गुपित आहे. त्या जोरावरच फुटीर सैन्य आगेकूच करत आहे.

सुदानमध्ये तेल आहे. सुदानमध्ये सोनं आहे. त्यावर अनेक देशांचा डोळा आहे. लाल समुद्राच्या काठावर 'पोर्ट सुदान' आहे. आफ्रिकेतल्या अनेक देशांना या बारमाही समुद्राचं आकर्षण आहे. पोर्ट सुदानच्या दक्षिणेला आणखी एक बंदर अमिरात उभारून देणार आहे, त्यासाठी अमिरात पैसा गुंतवणार आहे.

गेली साठ वर्षांपेक्षा जास्त काळ सुदानमधे अराजक आहे. अरब आणि काळे असे दोन वांशिक गट सुदानमध्ये आहेत, त्यांच्यात मारामारी आहे. अराजक असल्यामुळे सुदानमधे भीषण गरिबी आहे, इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालेलं नाही. शिक्षणाचा अभाव आहे, सुदानमध्ये आधुनिकता फक्त शस्त्रांच्या रूपात दिसते. कारभार करण्याचं कौशल्य सुदानजवळ नाही. सुदानमधल्या लोकांना लढाई दिसते, तेवढीच जमते.

गेल्या पन्नास वर्षांत सुदानमध्ये अनेक दुष्काळ झाले, अनेक लढाया झाल्या. उपासमारीने माणसं मेली. लढायांत माणसं मेली. आज लढाईत असलेल्या दोन्ही सैन्यांनी अपरिमित अत्याचार केलेत, बलात्कार केलेत. लाखो मेलेत, लाखो इतर देशात स्थलांतरित झालेत. सत्ता मिळवण्यासाठी आणि मिळालेली टिकवण्यासाठी माणसं काय करतात, त्याचे परिणाम समाजावर कसे होतात याचं सुदान हे एक उदाहरण आहे.

एकूणात पाहता अंतर्गत मारामारी थांबेल असं दिसत नाही, अराजक थांबेल असंही दिसत नाही.

निळू दामले | 9820971567 | damlenilkanth@gmail.com

निळू दामले हे जगभरातील विविध विषयांवर अभ्यासपूर्ण आणि सहज शैलीत लिखाण करणारे ज्येष्ठ पत्रकार आहेत.







प्रतिक्रिया लिहा...

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results